Pune Traffic News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे शहरातील वाहतुकी संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात आज अर्थातच 7 सप्टेंबर 2023 ला दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
सायंकाळी हा उत्सव साजरा होणार आहे. यासाठी विविध शहरात विविध मंडळांच्या माध्यमातून दहीहंडीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी हजारो, लाखो रुपयांची बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होणार आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिक या शहरांमध्ये दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील काही भागातील वाहतूकित मोठा बदल केला जाणार आहे.
शहरातील काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मगर यांनी सांगितल्याप्रमाणे, शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक सायंकाळी पाच वाजेपासून ते दहीहंडी संपेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
यामुळे या काळात नागरिकांनी या परिसरात प्रवास करताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन मगर यांनी यावेळी केले आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शहरात बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे होणारी वाहतूक या काळात एकेरी केली जाणार आहे.
याशिवाय मजूर अड्डा चौक म्हणजेच बुधवार चौक ते दत्त मंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवा सदन चौक, मजुर अड्डा चौक ते आप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा. जेणेकरून नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.