Pune Successful Farmer : शेतीचा व्यवसाय हा गेल्या काही वर्षांपासून मोठा आव्हानात्मक बनला आहे. याचे कारण म्हणजे नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जर समजा अधिकचा खर्च करून, संकटांचा सामना करून चांगला शेतमाल पिकवला तर शेतमालाला बाजारात फारसा भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी राजा आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे चांगलाच भरडला जात आहे.
परिणामी अनेकांचा शेतीवरून मोहभंग झाला आहे. अनेकजण शेती ऐवजी नोकरी किंवा इतर उद्योगधंद्यांमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. मात्र असे असले तरी आजही अनेक शेतकरी विविध संकटांचा सामना करत चांगली शेती करत आहेत.
नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. बारामतीमधील नवयुवक शेतकरी दिग्विजय जगताप यांनी देखील नवीन प्रयोगातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
खरंतर पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यातील बागायती पट्टा हा ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र उसाच्या या आगारात दिग्विजय यांनी पपईची यशस्वी शेती करून दाखवली आहे. पपईच्या साडेचार एकर क्षेत्रातून दिग्विजय यांना लाखो रुपयांची कमाई देखील होत आहे.
दरम्यान आज आपण दिग्विजय यांनी पपईच्या शेतीसाठी कशा पद्धतीने नियोजन केले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील दिग्विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 45 एकर जमीन आहे.
यातील साडेचार एकरावर त्यांनी पपईची लागवड केली आहे. सुरुवातीला मात्र त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पपई लागवड केली होती. 2022 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पपईची लागवड केली. त्यांनी उस्मानाबाद येथून 15 नंबर जातीची पपईची अडीच हजार रोपे मागवली.
पपई लागवडीपूर्वी जमिनीची योग्य पद्धतीने मशागत केली. शेणखत टाकून जमिनीची नांगरणी करून घेतले आणि पपई लागवडीसाठी बेड तयार झालेत. बेड तयार झाल्यानंतर त्यांनी 7 बाय 8 एवढे अंतर ठेवून पपईची लागवड केली.
सात महिन्यांपर्यंत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी पपईच्या रोपांना १९-१९, १२-६१ आणि कॅल्शियम नायट्रेट यांसारखी खते दिलीत. प्रत्येक पंधरा दिवसाला पपईच्या रोपांना खते आणि औषधे दिली गेलीत.
पपई लागवड करून सात महिने झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उत्पादन मिळाले. या दोन एकरातून त्यांना 80 टन एवढे उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे या मालाला सरासरी 25 रुपये प्रति किलो असा दरही मिळाला आहे. यामुळे त्यांना पपईच्या दोन एकर जमिनीतून चांगला नफा मिळाला आहे.
त्यामुळे गदगद झालेल्या दिग्विजय यांनी आणखी अडीच एकर क्षेत्रावर पपई लागवड विस्तारली आहे. निश्चितच दिग्विजय जगताप यांचा हा पपई लागवडीचा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून हा प्रयोग इतरांसाठी देखील मोठा मार्गदर्शक ठरणार आहे.