पुण्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! 40 डिग्री तापमानातं पिकवलं काश्मीरमधील सफरचंद, कोणत्या वाणाची केली निवड?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेतीत मोठा बदल केला आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील असाच काहीसा प्रयोग करून दाखवला आहे. येथील शेतकऱ्याने चक्क काश्मीरमधील सफरचंद उत्पादित करण्याची किमया साधली आहे.

खरे तर सफरचंद म्हटले की आपल्या डोळ्यापुढे सर्वप्रथम उभे राहते ते काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश मधील दृश्य. तेथे थंड हवामान असल्याने त्या ठिकाणी सफरचंदाचे पीक चांगले बहरते.

पण, दौंड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने 40 डिग्री तापमानात देखील सफरचंद पिकवले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याचा हा नवखा प्रयोग पंचक्रोशीत चांगलाचं चर्चेचा विषय ठरला आहे.

दौंड तालुक्यातील शिंदेवाडी – पारगाव येथील दत्तात्रय शिवाजी भोसले यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हरमन 909 या सफरचंद वाणाची लागवड केली. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने त्यांनी हा प्रयोग केला आहे.

सफरचंदाच्या बागेसाठी खूपच कमी मनुष्यबळ लागते यामुळे त्यांनी सफरचंद पीक उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून त्यांनी दौंड सारख्या उष्ण हवामानात सफरचंदाचे यशस्वी उत्पादन मिळवले आहे.

भोसले यांनी चाळीस गुंठ्यात 280 सफरचंद रोपे लावली होती. रोपांची लागवड झाल्यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. सोबतच सफरचंद पिकाला जास्त क्षार असलेले पाणी चालत नसल्याने त्यांनी शेतात आरो प्लांट देखील बसवला आहे.

सफरचंद पिकाला आपल्याकडील नॉर्मल पाणी देखील चालते मात्र गोडे पाणी या पिकासाठी अधिक फायदेशीर ठरते यामुळे त्यांनी आरो प्लांट बसवण्याचा निर्णय घेतला. भोसले यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, त्यांनी त्यांचे मनाली येथील मित्राकडून सफरचंदाची माहिती घेतली होती.

तसेच त्यांनी तेथूनच याची रोपे देखील विकत घेतली आहेत. सध्या भोसले यांनी लावलेल्या सफरचंदाला फळे लागली आहेत. मात्र याचा व्यावसायिक बहार ते पुढील वर्षीच घेणार आहेत. त्यामुळे अंदाजे चार महिन्यानंतर त्यांच्या या झाडाला फळे लागणार आहेत.

एकंदरीत, काश्मीर हिमाचल प्रदेश यांसारख्या थंड हवामानात वाढणारे हे पीक दौंड सारख्या उष्ण हवामानात यशस्वीरित्या उत्पादित करून भोसले यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. या अनोख्या प्रयोगातून इतरांना देखील मोठी प्रेरणा मिळणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा