Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनत चालली आहे. पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होत असून या शहरात दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. अशा परिस्थितीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडणे हे एक चॅलेंजिंग काम ठरत आहे.
दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या रिंग रोड संदर्भात एक महत्त्वाची माहिती आमच्या हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंग रोडच्या पश्चिम भागात बाधित होणाऱ्या 32 गावांचे तसेच पश्चिम रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या 48 गावांपैकी चार गावांचे जमिनीचे फेर मूल्यांकन पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या गावातील जमिनीचे दर देखील निश्चित झाले आहेत.
तसेच उर्वरित गावातील फेरमूल्यांकनाचे काम आणि जमिनीचे अंतिम दर ठरवण्याचे काम 20 जुलै पर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ज्या बाधित गावांमध्ये दर निश्चिती झाली आहे त्या गावातील संबंधित जमीन धारकांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे.
या नोटीसेत बाधित शेतकऱ्यांना त्यांची किती जमीन बाधित होणार आहे आणि त्या बदल्यात त्यांना किती मोबदला मिळणार आहे याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली राहणार आहे. ही नोटीस बजावल्यानंतर जर बाधित शेतकऱ्यांची हरकत नसेल तर संमतीपत्र घेतले जाणार आहे. तसेच जे शेतकरी यासाठी लगेच सहमती देतील त्यांना पाचपट मोबदला दिला जाणार आहे.
मात्र जे सहमती देणार नाहीत त्यांच्या जमिनीचे सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे आणि त्यांना मात्र चारपट मोबदला मिळणार आहे. एकंदरीत पुणे रिंग रोड साठी बाधित होणाऱ्या जमिनीचे 20 जुलै पर्यंत अंतिम दर ठरवले जाणार असून लवकरच रिंग रोडचे काम सुरू होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.