Pune Ring Road :- रिंगरोडचे संपादन करताना जमिनींवर आधी बागायती, हंगामी बागायतीचे शिक्के असताना आता जिरायतीचे शिक्के मारून त्याप्रमाणे भाव दिला जात आहे, असे करणे अन्यायकारक आहे.
प्रशासनाने हंगामी बागायती, बागायती हे शेतकऱ्यांचे दावे मान्य करून मोबदला द्यावा, मोबदल्यात पाचपट वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
हवेली तालुक्यातील राठवडे, वरदाडे, सांगरून, तातवडी, बाहुली आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले.
रिंगरोडसाठी जमिनी संपादित करून त्याचा मोबदला देण्याची सुरुवात प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, हवेली तालुक्यातील बाधित गावांमध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीची नोंद आधी बागायत अथवा हंगामी बागायत अशी केली होती. त्यानुसार भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
मात्र, आता या जमिनीवर जिरायतीच्या नोंद करून त्या प्रमाणे भाव देण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जमिनीला हंगामी बागायती तसेच बागायतीप्रमाणे भाव मिळावा, बिगरशेती जमिनीलादेखील फॅक्टर दोनप्रमाणे दुप्पट भाव मिळावा, अशी मागणी केली.
अहवाल मागवणार
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. त्यावेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी आधी हंगामी तसेच बागायती नोंद केल्या, नंतर जिरायती नोंद लावल्या यासंदर्भात अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.