Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहराबाहेरून बाह्य वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रिंग रोडचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याची रुंदी 110 मीटर एवढी अशी. याचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पूर्ण केले जाणार आहे. तूर्तास पश्चिम भागातील रिंग रोड साठी जमीन भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
पश्चिम रिंग रोड मध्ये भोर तालुक्यातील 5, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ तालुक्यातून 6 गावे म्हणजे पश्चिम रिंग रोड साठी 37 गावे बाधित होणार आहेत. या गावांमधील 697 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी संपादित केले जाणार असून यामुळे 2404 जमीनधारक शेतकरी बाधित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेर मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रिंग रोडसाठी आता प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 405 एकर जमिनीचे संपादन झाले आहे. तसेच बाधित जमिनधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत 830 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
उर्वरित जमिनीचे देखील लवकरात लवकर संपादन केले जाणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पश्चिम भागातील बाह्य वळण रस्त्यासाठी आता सक्तीने भूसंपादन केले जाणार असल्याचे वृत्त एका रिपोर्ट मधून या आधीच समोर आले आहे.
यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एमएसआरडीसी कडे अर्थातच राज्य रस्ते विकास महामंडळाकडे भूसंपादनासाठी आणखी 3000 कोटी रुपयांची मागणी देखील केली जाणार आहे. कारण की सक्तीने भूसंपादन सुरू केले तर जमीनधारकांना तात्काळ मोबदला द्यावा लागणार आहे.
सध्या स्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे 1000 कोटी रुपयांचा निधी वळता केला होता. यापैकी 830 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आगामी काही दिवसात उर्वरित निधीचे देखील भूसंपादनासाठी वाटप होणार आहे.
अशा स्थितीत भूसंपादन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निधीची आवश्यकता भासणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच लेखी प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने प्रकाशित केले आहे. यामुळे पुणे शहराबाहेरून प्रस्तावित करण्यात आलेल्या या बाह्यवळण रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.