पुणे, पिंपरी चिंचवड शहरासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी नागरिक आपल्या आयुष्याची कमाई लावतात. अशा प्रसंगी फसवणूक झाल्यास खूप मोठा धक्का बसतो यासाठी शासनाने ‘रेरा’ची स्थापना केली. यामुळे काही प्रमाणात बेकायदा बांधकामांबाबत आळा बसला आहे. मात्र, अनेक गृहप्रकल्प नोंदणी केल्याची ग्राहकांची फसवणूक करतात यामुळे महारेराच्या नोंदणी ग्राहकांनी कायदेतज्ज्ञांकडून तपासून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
केंद्र सरकारच्या महारेरा कायदयाची २०१७ पासून अंमलबजाणी करण्यात येवू लागली. त्यानुसार बांधकाम व्यवसायिकांना महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कायद्यानुसार बांधकाम व्यवसायिकाने कमिन्समेंट सर्टिफिकीट घेतल्यावर गृहप्रकल्पाची नोंदणी केली जाते. सुमारे ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला किंवा आठपेक्षा जास्त सदनिका विक्री करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला ‘महारेरा’कडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ही नोंदणी करताना मंजूर नकाशा, आवश्यक परवानग्या आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रे महारेराकडे सादर करणे बंधनकारक असून, ही सर्व कागदपत्रे संबंधित प्रकल्पाच्या वेबसाइटवर ग्राहकांसाठी उपलब्ध करणे अनिवार्य आहे. बांधकाम व्यावसायिकांना गृह खरेदीदाराच्या संमतीशिवाय त्यात कोणतेही बदल करण्याचे अधिकार नाहीत. तसेच यात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची इत्थंभूत माहिती त्यामध्ये प्रकल्पामध्ये असलेल्या सदनिकांपैकी किती सदनिका विकल्या गेल्या, किती सदनिकांचे बुकिंग झाले आहे, विक्री न झालेल्या सदनिका किती तसेच गहाण ठेवलेल्या सदनिकांचीही माहिती देण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आह होते.
यानंतर ग्राहकांनी महारेराप्रकल्प असलेल्या सदनिका बिनधास्तपणे खरेदी केल्या. मात्र, मागील काही महिन्यांपासून महारेराकडील नोंदणीच्या खोट्या माहितीच्या आधारे ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. काही बांधकाम व्यवसायिकांनी बनावट महारेरा नोंदणीकृत प्रमाणपत्र अपलोड केले आहे. त्यामुळे आता महारेराच्या अधिकृत संकेतस्थळावून खात्री करुन तो नोंदणी क्रमांक अपडेट आहे का? हे तपासूनच घर खरेदी करावे लागणार आहे.
रेरामुळे हा फायदा..
‘महारेरा’ पूर्वी ग्राहकांच्या फसवणुकीविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. त्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्यामुळे घर खरेदीदार नागरिकही समाधानी आहेत. तसेच गृहप्रकल्पाच्या जाहिरातीमध्ये पूर्वी बिल्टअप, सुपर बिल्टअप असे उल्लेख करून ग्राहकांची फसवणूक होत असे. मात्र, आता जाहिरातीतील महारेरा कार्पेट एरियाचा उल्लेख होत केला जातो. याशिवाय एखादा प्रकल्प बंद करण्यात येत आहे याचीही माहिती महारेराकडून वेबसाईटवर दिली जाते त्यामुळे महारेराची अधिकृत वेबसाईट घर खरेदीदारांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
बनावट प्रमाणपत्राचा सुळसुळाट
काही विकासक महारेरा क्रमांक जाहीर करतात मात्र वाचताही येणार नाही एवढ्या बारीक अक्षरात असतो. फेसबुक, ऑनलाईन जाहिरातीत महारेरा क्रमांक छापला जात नाही असेही दिसून येते. काहींनी चक्क बनावट नोंदणी प्रमाणपत्रे सादर केली आहेत यावर आता महारेराने गांभीर्याने नोंद घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सदनिका खरेदीदारांनी फक्त महारेरा नोंदणीकृत आहे म्हणून नाही तर तो नोंदणी क्रमांक ऑनलाईन तपासूनच प्रकल्पातच गुंतवणूक करणे सोईचे ठरणार आहे.