Pune Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरंतर दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
पुणे ते अमरावती आणि अमरावती ते पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वास्तविक, अमरावतीसह विदर्भातून पुण्याला आणि पुण्याहून विदर्भाला जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. सणासुदीत तर ही संख्या आणखी वाढत असते.
दिवाळीत आणि दिवाळीनंतर काही दिवस या मार्गांवर मोठी गर्दी होत असते. हीच गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने दिवाळीच्या काळात पुणे ते अमरावती दरम्यान विशेष साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे या विशेष एक्सप्रेस ट्रेनची मुदत संपणार होती. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांच्या माध्यमातून पुणे ते अमरावती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ मिळाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान प्रवाशांची ही मागणी लक्षात घेता आणि या मार्गावरील वाढलेली गर्दी पाहता मध्य रेल्वेने या एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावरील एक्सप्रेस ट्रेन दोन डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
पुणे ते अमरावतीच्या आणि अमरावती ते पुणे चार अशा एकूण आठ फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. यामुळे या मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईन असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कसं आहे वेळापत्रक?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ ही विशेष एक्सप्रेस ट्रेन एक डिसेंबर 2023 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस चालवले जाणार आहे. ही गाडी शुक्रवारी आणि रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री २२.५० वाजता अमरावतीकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता अमरावती येथे पोहचेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१४४० ही विशेष एक्सप्रेस ट्रेन अमरावती ते पुणे दरम्यान दोन डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीमध्ये आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.
ही Train शनिवारी आणि सोमवारी रात्री १९.५० वाजता अमरावती येथून पुण्याकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० वाजता पुणे येथे पोहोचेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विशेष एक्सप्रेस ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर थांबवण्याचे नियोजन आहे. ही गाडी बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पुर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर, जिंती रोड, दौंड, केडगाव, उरळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या मार्गावरील नागरिकांचा प्रवास गतिमान होईल आणि सणासुदीच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.