Pune News : मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या महिन्यात पुणेकरांना पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज येथील गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो मार्गांची भेट मिळाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मार्गांवरील मेट्रोंना प्रवाशांनी भरभरून असे प्रेम दिले आहे.
या मेट्रो मार्गांमुळे शहरातील हजारो नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी एक मोठी आनंदवार्ता दिली आहे. पवार यांनी पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी हा मार्ग खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
या मार्गामुळे पिंपरी ते निगडीचा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे या मेट्रो मार्गाचे काम केव्हा सुरू होते याकडे विशेष लक्ष आहे. दरम्यान या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी काल रविवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतांना दिली आहे.
यामुळे पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना येत्या काही वर्षात या मेट्रो मार्गाची भेट मिळू शकते असा आशावाद आता व्यक्त होत आहे.
कसा असेल मार्ग?
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वेगवेगळे मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. तर काही मेट्रो मार्गांचे काम सुरू होण्याच्या अवस्थेत आले आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम देखील येत्या काही महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
हा मार्ग पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या दरम्यानच्या चौकापर्यंत राहणार आहे. हा मार्ग ४.४१३ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
याबाबत पवार यांनी सांगितले की या मेट्रो मार्गासाठी केवळ एका केंद्रीय मंत्र्यांची सही बाकी आहे. विशेष म्हणजे यासाठी ते आता नवी दिल्लीला जाणार आहेत. अर्थातच येत्या काही दिवसात या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच स्वारगेट ते निगडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाच्या काम देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.