Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते आणि रेल्वे मार्गाचा विस्तार केला जात आहे. सोबतच शहरात मेट्रो मार्ग देखील विकसित केले जात आहेत. मेट्रोमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल असा आशावाद प्रशासनाला आहे.
त्यामुळे मेट्रोचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो सुरू आहे.
विशेष म्हणजे या मार्गाचे विस्तारित मार्ग देखील लवकरच सुरू होणार आहेत. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा विस्तारित मार्ग मार्च 2024 अखेरपर्यंत सुरू होणारा असा आशावाद व्यक्त होत आहे.
तसेच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा विस्तारित मेट्रो मार्ग देखील चालू वर्षातचं सुरू करण्याचे नियोजन आहे. अशातच मात्र पुणे मेट्रोबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे मेट्रोचा आता विस्तार केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) पुणे-शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि खडकवासला ते खराडी दरम्यान विस्तारित मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या व्यवहार्यतेचा सक्रियपणे शोध घेत आहे.
अंमलबजावणीसाठी खाजगी भागीदारी किंवा कंत्राटदाराची नियुक्ती हा सर्वात योग्य दृष्टीकोन आहे का याचे मूल्यांकन करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे प्रकल्पाच्या अंमलबजावणी मॉडेलवर निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
कसे असणार विस्तारित मेट्रो मार्ग
पुणे-शिवाजीनगर ते लोणी काळभोर : खरतर पीएमआरडीए शहरातील मध्यवर्ती भागाला हिंजवडी या आयटी पार्कसोबत मेट्रो मार्गाने जोडणार आहे. पीएमआरडीए हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग विकसित करत आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गाचा पुढे विस्तारही करण्याचे नियोजन आहे.
यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगरचा मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. या प्रस्तावित विस्तारित मार्गामध्ये सासवड रोडवरील संभाव्य शाखा असलेल्या शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.
खडकवासला ते खराडी मेट्रो मार्ग : पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. विशेष म्हणजे हा मार्ग अंशता खुला देखील झाला आहे. पिंपरी चिंचवड ते सिविल कोर्ट पर्यंतचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू आहे. बाकी राहिलेला सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतचा मार्ग देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
या मार्गाच्या कामाची जबाबदारी मात्र महामेट्रोकडे आहे. दरम्यान या प्राधिकरणाने खडकवासला ते खराडी या 28 किमी लांबीच्या मार्गाचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना जलद कनेक्टिव्हिटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.