Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. तर काही महामार्गांची कामे प्रस्तावित असून येत्या काही दिवसात या महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे.
पुणे रिंग रोड साठी सध्या स्थितीला भूसंपादनाचे काम सुरू असून याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया देखील राबवली जात आहे. इच्छुक कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या असून आता या निविदांची छाननी होऊन येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकणार आहे. अशातच पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खते तर सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात प्रचार सभां आयोजित होत आहेत.
येत्या १३ तारखेला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याच चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून जय्यत प्रचार केला जातो. दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
गडकरी यांनी पुण्याला एक नवीन महामार्ग मिळणार अशी घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वाघोली येथे आयोजित प्रचार सभेमधील भाषणात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास भविष्यात अवघ्या दोन तासात करता येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी पुणे ते औरंगाबाद यादरम्यान नवीन महामार्ग तयार होणार अशी घोषणा केली आहे.
हा महामार्ग राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार असून यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास जलद होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, 10 हजार कोटी रुपये खर्चून पुणे ते शिरूर मल्टीलेयर प्लाय ओव्हर मार्ग बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोलीत केली आहे. यावेळी त्यांनी पुणे ते पंढरपूर हा पालखी मार्ग निवडणुकीनंतर सुरू होईल असे म्हटले आहे. या मार्गाचे उद्घाटन निवडणुकीनंतर केले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.