Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा लोकल ट्रेनबाबत. खरंतर सध्या स्थितीला पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सुरू आहे. या लोकलमुळे संबंधित भागातील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे.
मात्र असे असले तरी पुणे शहरातील लोकलचा विस्तार झाला पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यात पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन प्रमाणेच पुणे ते दौंड या मार्गावर देखील लोकल सुरू झाली पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे ते दौंड या मार्गावर डिझेलवरील डेमु ट्रेन सुरु आहे. पण या गाडीचा वेग हा इलेक्ट्रिक मेमूपेक्षा कमी आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद गतिमान आणि आरामदायी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक मेमु गाडी चालवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून दौंडवासीयांकडून केली जात आहे.
शिवाय या मार्गाला उपनगरीय मार्गाचा दर्जा दिला गेला पाहिजे ही देखील मागणी केली जात आहे. अशातच मात्र याबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या मार्गावर लवकरच इलेक्ट्रिक लोकल सुरू केली जाणार आहे.
त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अर्थातच 14 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वेच्या विभागीय कार्यालयात एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत खासदार एडवोकेट वंदना चव्हाण यांनी सध्या सुरू असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. सध्या स्थितीत सुरू असलेल्या लोकल सेवेत वाढ करण्यासोबतच लोकल सेवेचा विस्तार दौंड पर्यंत करावा अशी मागणी देखील या बैठकीत चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आली.
दरम्यान या बैठकीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या या मागणीवर सकारात्मक असे पाऊल उचलले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. यामुळे आता रेल्वे बोर्ड यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पुणे-दौंड मार्गावर सुरू असलेल्या डेमू गाड्या हटवून त्याजागी इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या मेमू लोकल गाड्या चालवणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. त्यामुळे दौंडवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.