Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यासह संपूर्ण राज्यात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुणे जिल्ह्यात विविध रस्ते विकासाची, रेल्वे विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न केले जात आहेत.
यानुसार आता छत्रपती शिवप्रभूंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवक्षेत्र शिवनेरी गडावर रोपवे तयार केला जाणार आहे. या ऐतिहासिक किल्ल्यावर रोपवे झाला पाहिजे अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी लावून धरली होती.
यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे मोठा पाठपुरावा केला होता. एवढेच नाही तर त्यांनी या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती.
त्यावेळी गडकरी यांनी खासदार महोदय यांना पर्वतमाला योजनेअंतर्गत जर राज्य शासनाने भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला तर निधी उपलब्ध होईल असे आश्वासन दिले होते.
यानुसार त्यांनी राज्य शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली होती. मग राज्य शासनाकडून हा प्रस्ताव तयार करून पाठवला गेला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी शिवनेरी, जेजुरीसह राज्यात 12 ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांकडे जुलै 2022 मध्ये सुपूर्द केला.
दरम्यान, या प्रकल्पाच्या कामासाठी एनएचएलएमएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. मात्र या कंपनीसोबत सामंजस्य करार झालेला नव्हता.
दरम्यान, हाच करार 4 फेब्रुवारी 2024 ला पूर्ण झाला आहे. संबंधित कंपनी आणि राज्य शासन यांच्यामध्ये या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सामंजस्य करार पूर्ण झाला आहे.
यामुळे आता प्रकल्पाच्या पुढील कामाला चालना मिळणार अशी अशा व्यक्त होत आहे. हा करार पूर्ण झाला असल्याने आता या प्रकल्पासाठी आवश्यक डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम पूर्ण होऊ शकणार आहे.
यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे. तथापि, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी आणखी बराच कालावधी वाट पाहावी लागणार आहे.