Pune News : मुंबई, पुण्यासहित राज्यातील अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी भीषण बनत चालली आहे. ही वाहतुककोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. पुणे अन पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
तसेच आता पुणे-नाशिक महामार्गवरील वाहतुककोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नाशिक फाटा ते खेड दरम्यान उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. यासाठी तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
खरेतर या उन्नत मार्ग प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी एक महत्वाची बैठक झाली, यात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
हा प्रकल्प बांधा वापरा अन हस्तांतरित करा या तत्वावर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर पुणे ते खेड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प ?
नाशिक फाटा ते खेड दरम्यान उन्नत मार्ग तयार होणार आहे. या प्रकल्पाच्या DPR ला नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाची किंमत 7 हजार 827 कोटी एवढी आहे. पण यासाठी 8 हजार कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
यामुळे पुणे ते खेड हा प्रवास गतिमान होणार आहे, परिणामी पुणे ते नाशिक प्रवासाचा कालावधी देखील कमी होणार आहे. हा एक आठपदरी उन्नत रस्ता राहणार आहे. या अंतर्गत सध्याच्या चार पदरी रस्त्याचे विस्तारिकरण होईल अन 6 लेनचा रस्ता विकसित होणार आहे.
तसेच सर्व्हिस रोड सुद्धा बांधले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका या प्रकल्पासाठी मोशीपर्यंतची जागा उपलब्ध करून देणार आहे.
मोशीच्या पुढे आवश्यक असणारी जागा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकारण जागा उपलब्ध करून देणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरु आहे.
हे काम झाल्यावर मग प्रत्यक्षात याचे काम सुरु होणार आहे. येत्या 2 महिन्यात म्हणजे सप्टेंबरपर्यंत भूसंपादन पूर्ण केले जाणार आहे अन मग ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात या मार्गाचे काम सुरू होणार अशी अपेक्षा आहे.