Pune News : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या माध्यमातूनही राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सुरू करण्यात आला आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात देखील दोन्ही गटांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात महायुतीकडून ज्ञानेश्वर काटके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान काटके यांच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते मैदानात उतरले आहे.
आज 9 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मतदारसंघातील लोणी काळभोर येथे काटके यांच्या प्रचारासाठी एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, प्रवीण काळभोर, अमित बाबा कांचन, जितेंद्र बेडेकर आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते.
दरम्यान या प्रचार सभेला बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्यात. अजित पवार यांनी या प्रचार सभेला संबोधित करताना, हवेलीचे वैभव असलेला यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना लवकर सुरु करणार अशी ग्वाही दिली.
तसेच पुणे-सोलापूर महामार्गासह नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यवत गावापर्यंत उड्डाणपुल तर स्वारगेट ते उरुळी कांचन पर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गुलटेकडीला जाण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत, म्हणून थेऊर येथील ‘यशवंत’च्या जागेत बाजार समिती सुरु करू.
तसेच हवेलीच्या पूर्व भागासाठी हडपसर महानगर पालिकेचे नियोजन आहे. परंतु, यासाठी समाविष्ठ गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.