Pune News : गेल्या काही दशकांमध्ये पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरात आणि उपनगरात राज्यभरातील कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातील विविध राज्यातून कामानिमित् स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दशकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असल्याने रोजगाराच्या शोधात या शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत.
त्यामुळे सहाजिकच शहरातील लोकसंख्या वधारली आहे आणि याचा परिणाम म्हणून महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची गर्दी वाढत आहे. सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वधारली आहे.
आता शहरात दोन-तीन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी देखील एक ते दीड तासांचा वेळ लागत आहे. यामुळे आता शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
याशिवाय आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी देखील सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान पुणे ते सातारा बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. खरंतर पुणे ते सातारा बाह्यवळण मार्ग हा एक वर्दळीचा महामार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते.
वाहनांच्या गर्दीमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी पण वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर कित्येकदा अपघात देखील झाले आहेत. या मार्गावर नऱ्हे ते रावेत या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर हा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदणी चौक ते रावेत दरम्यान नवीन मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. नऱ्हे ते रावेत दरम्यान एलिव्हेटेड हायवे उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतला असून, त्यासाठीचा प्रकल्प अहवाल देखील तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या एलिव्हेटेड हायवेसाठी तब्बल 4000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःच दिली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी आता बऱ्यापैकी कमी होईल असा आशावाद देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.