Pune-Nashik Semi High Speed Railway : गेल्या दोन ते अडीच दशकांपासून पुणे ते नाशिक दरम्यान रेल्वे मार्ग व्हावा अशी पुणे आणि नाशिक दोन्ही शहरातील नागरिकांची मागणी आहे. खरंतर पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर नाशिक कृषी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. ही दोन शहरे पुणे, नाशिक, मुंबई या ट्रँगल मधील आहेत.
या दोन्ही शहरांचा विकास देखील मोठ्या गतीने झाला आहे. मात्र असे असले तरी ही दोन मोठी शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली गेलेली नाहीत. सध्या नाशिकहून जर पुण्याला प्रवास करायचा असेल तर रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगरमधून जाणार आहे.
मात्र हा नासिक-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग केंद्राच्या मंजुरी अभावी रखडला असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर गेल्या महा विकास आघाडी सरकारच्या काळात या मार्गाला गती देण्याचे काम झाले होते. तत्कालीन वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी या मार्गाच्या कामात स्वतः जातीने लक्ष घातले होते.
या प्रकल्पाचा त्यांनी गेल्या सरकारच्या काळात वेळोवेळी आढावा देखील घेतला होता. पण या नवोदित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हा प्रकल्प अपेक्षित अशा गतीने पुढे जात नाहीये. पण आता या सरकारमध्ये अजित पवार देखील समाविष्ट झाले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार असून ते या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत.
त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेतली होती. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. अशातच आता अजित पवार यांनी या प्रकल्पाबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करावा असे त्यांनी या प्रकल्पाबाबतच्या एका महत्त्वाच्या बैठकीत सांगितले आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर ठेवावा असे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.
पवार यांनी हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना यावेळी दिल्या आहेत. तसेच हा मार्ग मेट्रो कायद्यानुसार महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवावा असे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला पुन्हा एकदा गती मिळू शकते असा आशावाद आता व्यक्त केला जाऊ लागला आहे.