Pune Nashik Railway : मुंबई-नासिक-पुणे ही राज्याच्या विकासाची सुवर्ण त्रिकोण आहेत. या शहराच्या विकासावरून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास मोजला जातो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. मात्र ज्या शहरांवरून महाराष्ट्राचा विकास ठरतो त्याच शहरांमधील एका शहराचा विकास हा इतर दोन शहरांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
नासिक हे मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत कमी विकसित झालेले शहर आहे. विशेष बाब अशी की नाशिक ते पुणे प्रवास करण्यासाठी आजही थेट रेल्वे मार्ग तयार झालेला नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.
या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. हेच कारण आहे की, या दोन्ही शहरांमधला प्रवास जलद व्हावा यासाठी नवीन हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
दरम्यान याच रेल्वे मार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
खरेतर, उपमुख्यमंत्री महोदय काल नासिक येथील मेळा बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. नासिक येथे तयार झालेले हे मेळा बस स्थानक राज्यातील पहिले एसी बसस्थानक आहे.
दरम्यान या बसस्थानकाचे काल अर्थातच 10 फेब्रुवारी 2024 ला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांनी नासिक ते पुणे दरम्यानच्या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार झाला आहे, मात्र याच्या मार्गात महत्त्वाचा बदल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.
हा रेल्वे मार्ग आता नासिक-शिर्डी-पुणे असा राहणार आहे. अर्थातच हा मार्ग आता शिर्डी वरून नेला जाणार आहे. यामुळे मात्र 30 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाढणार आहे.
परंतु या रेल्वे मार्गावर अधिक जलद गतीने रेल्वे धावणार असल्याने नासिक ते पुणे हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. तसेच या बदललेल्या मार्गासह लवकरच या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असे त्यांनी सांगितले आहे.
या प्रकल्पांतर्गत 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता मात्र आता यामध्ये आणखी 30 किलोमीटरची वाढ होणार आहे अर्थातच 265 किलोमीटर एवढी या मार्गाची लांबी राहणार आहे.
हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा सहा तासाचा प्रवास अवघ्या पावणे दोन तासात पूर्ण होणार असा दावा होत आहे.