Pune Nashik Expressway : पुणे आणि नासिक ही दोन मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. या दोन शहरादरम्यान रोजाना हजारो नागरिक प्रवास करतात. यादरम्यान प्रामुख्याने रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत पुणे नाशिक महामार्गावर कायमच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवास अलीकडे आव्हानात्मक बनला आहे.
या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता नवीन पर्यायी मार्ग विकसित केला जाणार आहे. याबाबत खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पर्यायी रस्ता विकसित केला जाणार आहे. या पर्यायी मार्गामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी तर दूर होणारच आहे शिवाय या भागातील विकासाला चालना मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोये ते किवळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान आज आपण या महामार्गाला पर्यायी मार्ग कसा राहणार आहे? त्याचा रूट मॅप कसा राहणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसा असेल नवीन मार्ग ?
आमदार मोहिते पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता शासनाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. हा पर्यायी रस्ता म्हाळुंगे – आंबेठाण – कोरेगाव किवळे – कडूस – चास – घोडेगाव – जुन्नर – अकोले – संगमनेर असा प्रस्तावित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हा पर्यायी रस्ता खाजगी विकासकाडून विकसित केला जाणार असून. त्यामुळे या भागातील गावांना नववैभव प्राप्त होणार आहे.
काय म्हटले आमदार मोहिते पाटील
खेडचे आमदार मोहिते पाटील यांनी यावेळी उरण – पनवेल – कर्जत – पाईट राजगुरुनगर – शिरूर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याची कामे सध्या युद्ध पातळीवर केली जात असल्याचे नमूद केले आहे.
शिवाय बोरघाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई – पुणे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून उरण – पनवेल – कर्जत वांद्रे – आंबोली- पाईट- राजगुरूनगर- शिरूर हा रस्ता होत असूनं यामुळे पुणे- नगर , पुणे – नाशिक , पुणे – मुंबई या मार्गावरील वाहतूक कोंडी सुद्धा फुटणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.
एकंदरीत या दोन पर्यायी रस्त्यामुळे या भागातील महत्त्व वाढणार आहे. या भागाचा एकात्मिक विकास यामुळे सुनिश्चित होणार आहे. या रस्त्यावर दोन्ही कोरेगावांमध्ये जोडणारा भामा नदीवर मोठा पूल तयार होणार आहे. त्याचबरोबर चास या ठिकाणी देखील मोठा पूल प्रस्तावित असल्याचे मोहिते पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
निश्चितच शासनाची ही योजना पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार असून प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार असा आशावाद देखील जाणकार लोकांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे.