Pune Mumbai News : राजधानी मुंबई आणि पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या दोन्ही शहरादरम्यानची कनेक्टिव्हिटी आता सुधारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एम एस आर डी सी ने पुणे ते मुंबई हा प्रवास गतिमान व्हावा आणि 21 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी फुटावी यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे.
महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने एक-एक लेन वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. खरंतर, 21 वर्षांपूर्वी मुंबई-पुणे सहा पदरी द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. त्यावेळी या मार्गावर होणारी वाहनांची गर्दी पाहता हा मार्ग मोठा वाटत होता. मात्र अलीकडे या मार्गावर रोजाना 60 ते 70 हजार वाहने प्रवास करत आहेत. शिवाय ज्या दिवशी सुट्टी असते म्हणजेच शनिवारी आणि रविवारी या मार्गावर 90 हजारापर्यंत वाहने प्रवास करतात.
अशा परिस्थितीत हा सहा पदरी मार्ग सध्या अपुरा पडत असून यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता हा मार्ग आठ पदरी बनवला जाणार आहे. पुण्याकडे एक लेन आणि मुंबईकडे एक लेन अशा दोन नवीन लेन बनवल्या जाणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसेच दोन्ही बाजूने अतिरिक्त एक-एक अशा दोन लेन वाढवण्यासाठी काही जागा संपादित करावी लागणार आहे.
एम एस आर डी सी कडे थोड्याफार प्रमाणात जागा आहे, पण काही भागात यासाठी जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. तसेच सध्या या मार्गावर असलेल्या बोगद्यांचा विस्तार न करता नवीन दहा बोगदे बांधली जाणार आहेत. या व्यतिरिक्त या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात नवीन अकरा उड्डाणपूल तयार केले जाणार अशी माहिती जाणकार लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे.
यामुळे या मार्गावरील अपघातांची संख्या कमी होणार आहे. या मार्गावर दिशादर्शक फलक वाढवले जाणार आहेत आणि लेन कट करणाऱ्या अवजड वाहनांकडून दंड वसूल केला जाणार आहे. एकंदरीत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या द्रुतगती मार्गावर दोन लेन वाढवल्या जाणार असल्याने यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.