Pune-Mumbai Express Train : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या नेहमीच वाढत असते. अशातच पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या काही गाड्या सहा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे प्रवाशांना ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काही तांत्रिक कामे केली जात आहेत. सीएसएमटी येथे फलाट क्रमांक 10 आणि 11 विस्तारीकरणाचे काम केले जात आहे.
या कामासाठी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खरे तर दररोज या मार्गावर हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात.
शिक्षण, नोकरी पर्यटन आणि व्यवसायानिमित्त दररोज पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असून सीएसएमटी येथे होत असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामांमुळे या प्रवाशांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या कामामुळे कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्यात
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 28 मे ते दोन जून या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस 31 मे ते दोन जून या कालावधीत रद्द राहणार आहे.
पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस एक आणि दोन जूनला रद्द राहणार आहे. याशिवाय कुर्ला ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस ट्रेन एक आणि दोन जूनला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तथापि प्रवाशांनी या रद्द झालेल्या एक्सप्रेस लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.