Pune Metro Ticket :- पुणे मेट्रोची ‘पीसीएमसी ते फुगेवाडी’ व ‘वनाझ ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गिकेवर मागील वर्षी उद्घाटन झाले होते. आज मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘रूबी हॉल ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
या नवीन मार्गांच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘वनाझ ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून, अधिकतम भाडे ३५ रुपये असणार आहे. ‘पीसीएमसी ते वनाझ’ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल. तसेच, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ यासाठी ३० रुपये भाडे असेल. ‘वनाझ ते रुबी हॉल’ यासाठी ३५ रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये ३० टक्के सवलत असणार आहे.
शनिवार- रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असणार आहे. तसेच, मेट्रो कार्डधारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे. मेट्रो कार्ड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत रोख, क्रेडिट -डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, मेट्रो अॅपद्वारे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन, व्हॉट्सअप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीएमएलद्वारा फीडर बससेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. ३ कोचची ट्रेन असून त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगांसाठी मेट्रो कोचमध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानक व मेट्रो कोचमध्ये इमर्जन्सी हेल्प बटण ठेवले आहे.
…. असा प्रवास करणे होणार शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘गरवारे ते रुबी हॉल’ या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ५.०० वाजल्यापासून ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ व ‘वनाज ते रूबी हॉल’ अशी थेट मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंजचे स्थानकाचा वापर करून ‘पीसीएमसी ते वनाज’, ‘पीसीएमसी ते रुबी हॉल’ असा प्रवास करणे शक्य होईल.