Pune Metro News : मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आतापर्यंत शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर महा मेट्रो कडून मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरू झाली आहे.
या मार्गावरील मेट्रो ऑगस्ट 2023 मध्ये सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही मेट्रोमार्गांना हिरवा झेंडा दाखवला आहे. विशेष म्हणजे हे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. यामुळे पुणे शहरातील नागरिकांनी या दोन्ही मेट्रो मार्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.
अशातच पुण्यातील रहिवाशांना आणखी एक मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे लवकरच पुणे शहरात विस्तारित मार्गावर मेट्रो सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात डिसेंबर 2023 मध्ये एका विस्तारित मार्गावर मेट्रो धावणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग वनाज ते रुबी हॉल क्लिनिक पर्यंत सुरू आहे. दरम्यान रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी अर्थातच 6 ऑक्टोबर 2023 सायंकाळी साडेसात वाजता या मार्गावर यशस्वी ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे.
या मार्गाचे ट्रायल आता पूर्ण झाले असल्याने हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी चा हा टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गाचा पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र यासाठी एप्रिल 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या मार्गाचा उर्वरित भाग एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हा मार्ग देखील प्रवाशांसाठी खुला केला जाऊ शकतो.