Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. हे अपडेट पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात अर्थातच पुणे मेट्रोबाबत आहे. खरंतर पुणेकरांचा प्रवास गतिमान व्हावा तसेच शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रोचे जाळे वेगाने विकसित केले जात आहे.
आतापर्यंत पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. हे मेट्रो मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला आहे.
दररोज या दोन्ही मेट्रो मार्गांवरून 60,000 ते 65 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. अशातच आता पुणेकरांना लवकरच आणखी एका महत्त्वाच्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. महामेट्रोच्या दोन्ही मेट्रोमार्गानंतर आता पीएमआरडीए अर्थातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा मेट्रो मार्ग अर्थातच पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे.
आयटी हब म्हणून ख्यातीप्राप्त असलेले हिंजवडी ते शहरातील मध्यवर्ती ठिकाण शिवाजीनगर दरम्यान पीएमआरडीएकडून मेट्रो मार्ग तयार केला जात आहे. या मेट्रो मार्गाला पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जात आहे. हा हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा मेट्रो मार्ग 45 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाला आहे आणि उर्वरित काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामाचा नुकताच आढावा घेतला आहे. या आढावा बैठकीत पाटील यांनी या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केले आहे.
ही मेट्रो मार्गिका उभारणीतील अडथळे दूर करून हा मार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष द्या अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत. तसेच शासन स्तरावर मेट्रोमार्गिकेसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
कसा आहे प्रकल्प ?
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग एकूण 24 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्ग अंतर्गत 23 स्थानके विकसित केली जाणार आहेत. यासाठी 8313 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून 23 स्थानकांपैकी 16 स्थानकांचे काम सध्या सुरू आहे. मार्ग पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास फक्त 35 मिनिटात पूर्ण होणार आहे. या मार्गाचे आतापर्यंत 45 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेगापोलिस सर्कल, अँबोसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषिनगर , सकाळ नगर, विद्यापीठ, R.B.I., कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि दिवाणी न्यायालय ही या मार्गावरील महत्वाची स्थानके आहेत.