Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे मेट्रोसंदर्भात. खरंतर मेट्रोचा विषय हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
शहरातील नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतूकीचा वापर अधिक करावा यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो सुरू आहे. एक ऑगस्ट 2023 रोजी हे दोन्ही मेट्रो मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो मार्गांना प्रवाशांकडून विशेष पसंती दाखवली जात आहे. रोजाना या दोन्ही मेट्रोमार्गांवर 65,000 हून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. आता या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जात आहे. यानुसार सध्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे.
हे काम अगदी युद्ध पातळीवर सुरू असून या वर्षाअखेरपर्यंत हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. यापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे. तसेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे.
यामुळे या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा पुढे आणखी विस्तार केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय महा मेट्रोने घेतला असून यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या 4.4 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
आता या मेट्रो मार्गासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कामकाज मंत्रालयाकडून परवानगी घेतली जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने या मार्गाला परवानगी दिल्यानंतर या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी ही 3 महत्त्वाची स्थानके राहणार आहेत. येत्या तीन महिन्यात या मार्गाचे काम सुरू होऊ शकते असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
खरंतर हा मेट्रो मार्ग एक उन्नत मार्ग राहणार आहे. या मार्गासाठी केवळ 910 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे याच्या कामासाठी पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळवणे आवश्यक नाही. मात्र स्वारगेट ते कात्रज 5.4 किलोमीटर लांबीचा एक भुयारी मेट्रो मार्ग आहे. या मेट्रो मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज ही तीन रेल्वे स्थानके राहणार आहेत.
यासाठी 3663 कोटी रुपयांचा खर्च आवश्यक आहे. यामुळे या मेट्रो मार्गासाठी पंतप्रधान कार्यालयाची आवश्यकता राहणार आहे. त्यानुसार या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे याच्या मंजुरीसाठी अधिक वेळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे.