पुणेकरांना लवकरच मिळणार आणखी एका मेट्रो मार्गाची भेट ! कोणत्या भागातून धावणार मेट्रो ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : ऑगस्ट महिना पुणेकरांसाठी खूपच लकी ठरला. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांचे उद्घाटन मोदी यांनी केले.

उद्घाटनानंतर हे मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झालेत. विशेष म्हणजे या मार्गावरील मेट्रोला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. हेच कारण आहे की सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी यादरम्यानच्या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे दोन्ही मेट्रो मार्ग येत्या काही दिवसात पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. याशिवाय हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुद्धा लवकरच मेट्रो चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिंजवडी मध्ये अनेक नामांकित आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातून हिंजवडी येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग कामासाठी जातो.

अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शहराच्या शिवाजीनगर या मध्यवर्ती भागापासून ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून सध्या या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा दावा केला जात आहे.

अशातच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. पवार यांनी पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला आहे. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पासाठी एका केंद्रीय मंत्र्यांची अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता मिळाली की या प्रकल्पाचे काम लगेच सुरू होईल.

विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्र्यांकडून अंतिम मान्यता मिळवण्यासाठी पवार स्वतः दिल्लीला जाणार आहेत. यामुळे या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल असे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून वर्तवले जात आहे.

हा मार्ग पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक दरम्यान तयार केला जाणार आहे. या मार्गाचे एकूण अंतर ४.४१३ किलोमीटर एवढे असेल. याशिवाय पवार यांनी स्वारगेट ते निगडी दरम्यानही लवकरच मेट्रो मार्गाचे काम सुरू केले जाईल अशी ग्वाही यावेळी दिली आहे.