Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढलेली लोकसंख्या पाहता आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी पाहता सध्या शहरात विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली जात आहेत. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणि त्यांनी कमीत कमी खाजगी वाहनांचा वापर करावा यासाठी शहरात मेट्रोची जाळे विकसित करण्याचे काम शासन आणि प्रशासनाकडून केले जात आहे.
खरंतर 2022 मध्येच पुणे शहरात मेट्रोला सुरुवात झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन मेट्रो मार्ग अंशतः खुले करण्यात आलेत. मात्र त्यावेळी पुणेकरांनी मेट्रोला अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नाही.
परंतु एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड स्थानक ते सिविल कोर्ट दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विस्तारित मेट्रोमार्गांना प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे.
पुणेकरांनी विस्तारित मेट्रो मार्गाला खूपच पसंती दाखवली आहे. यामुळे महा मेट्रो सहित शासन आणि प्रशासन गदगद पाहायला मिळत आहेत. पुणे मेट्रो मधून दिवसाकाठी 65,000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. मात्र अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोस्थानकावर एक तरुण सायकल चालवत असल्याचे आढळले.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओ नंतर मेट्रो प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महा मेट्रोने याबाबत नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत. महा मेट्रोने दिलेल्या नवीन सूचनेनुसार मेट्रो स्थानकाच्या आत आणि मेट्रोमध्ये सायकल घेऊन जाण्यास परवानगी आहे मात्र मेट्रोस्थानकात सायकल चालवण्यास परवानगी नाही.
मेट्रो स्थानकात एक तरुण सायकल चालवत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर महा मेट्रोने या सूचना निर्गमित केल्या आहेत. यापुढे कोणीही मेट्रो स्थानकात सायकल चालवू नये, मेट्रो स्थानकाच्या बाहेर पर्यंतच सायकल चालवून यावे असे देखील यावेळी प्रशासनाने सुचित केले आहे.