Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. आहेत. तर काही मेट्रो मार्गांचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पुणेकरांना आणखी नवीन मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे.
सध्या स्थितीला वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट या दोन मेट्रोमार्गांवर मेट्रोची सेवा सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे उद्घाटन ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. हे मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गांना प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे.
दिवसाकाठी या मार्गांवरून तब्बल 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. एवढेच नाही तर गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली होती. मात्र पुणे मेट्रो स्थानकांमध्ये केवळ वेळ घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत पुणे मेट्रो प्रशासनाने आता एक नवीन नियम तयार केला आहे.
या नवीन नियमामुळे आता मेट्रो स्थानात फक्त वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे. खरंतर, पुणे मेट्रोने प्रवास करणारे अनेक जण तिकीट काढून स्थानकात गेल्यानंतर आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची विनाकारण गैरसोय होते. यामुळे मेट्रो प्रशासनाकडून यावर उपाय म्हणून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामेट्रोने आता प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक असल्याचा नवीन नियम तयार केला आहे. यामुळे आता मेट्रो प्रवाशांना तिकीट काढून झाल्यानंतर वीस मिनिटात प्रवास सुरू करणे बंधनकारक राहणार आहे. याचबरोबर तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर प्रवास संपवून प्रवाशाने ९० मिनिटांत बाहेर पडणे आवश्यक आहे.
सदर नियमांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या नियमाचीही महामेट्रोने अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. यामुळे जर तुम्हीही पुणे मेट्रोने प्रवास करत असाल तर हा नियम लक्षात ठेवणे तुमच्यासाठी देखील आवश्यक आहे.