Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच पुणेकरांना एक गोड बातमी मिळाली आहे. ती म्हणजे शहरातील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण करण्याचे काम गती पकडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत संबंधितांना काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. यामुळे शहरात लवकरच मेट्रोचे जाळे विणले जाणार अशी आशा व्यक्त होत आहे.
सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी यापैकी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हे दोन मार्ग सुरू आहेत.
विशेष म्हणजे या मार्गांचा उर्वरित भाग अर्थातच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. अशातच आता शहरातील मेट्रोमार्गांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणासंदर्भात महामेट्रो, राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्यात त्रिपक्षीय करार करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिले आहेत.
तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिकांचा म्हणजे स्वारगेट ते लोणी काळभोर, हडपसर ते खराडी तसेच रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेंचा विस्तारीकरणाचा तांत्रिक अहवाल तयार करावा, त्यासाठी सल्लागार नियुक्त करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
एवढेच नाही तर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत राजभवन येथे पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशाही सूचना उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
मात्र या सुधारित प्रकल्पास केंद्रशासनाचे मान्यता आवश्यक राहणार आहे. अशा परिस्थितीत या सुधारित प्रकल्पास केंद्राकडून मान्यता मिळवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे.
मंत्रालयात मेट्रो संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी हे आदेश संबंधितांना दिले आहेत. यामुळे आता पुणे शहरात लवकरच मेट्रोचा विस्तार होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.