Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित व्हावा यासाठी महामेट्रोच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम सुरू आहे. सध्या स्थितीला शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट दरम्यानचा पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी दरम्यानचा वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हे दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गांचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग एप्रिल 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा विस्तारित मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली असून आता या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या डीपीआरला नुकतीच केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. अशातच आता महामेट्रोच्या माध्यमातून या मार्गाचे काम केव्हा सुरू होऊ शकते याबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी या मार्गासाठीचे निविदा प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल आणि तदनंतर लगेचच या मार्गाचे काम सुरू होईल असे सांगितले आहे. अर्थातच या मेट्रो मार्गाचे येत्या तीन महिन्यात बांधकाम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बांधकाम सुरू झाल्यानंतर फक्त तीन वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने आखले आहे. खरंतर, हा प्रकल्प मंजुरी अभावी दोन वर्षांपासून दिल्ली दरबारी पडून होता.मात्र या प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळत नव्हती.
पण राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर या प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला होता. शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली.राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या हालचाली वाढल्यात आणि आता या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
23 ऑक्टोबर 2023 रोजी या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
यामुळे निगडे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना देखील लवकरच मेट्रोचा लाभ मिळणार आहे. हा मेट्रो मार्ग एकूण 4.413 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. चिंचवड स्टेशन (महावीर व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौकनिगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) ही या मार्गावरील महत्वाची स्थानके राहणार आहेत.