Pune-Kolhapur Railway : पुणे आणि कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन अतिशय महत्त्वाची शहर आहेत. कोल्हापूरहून पुणे आणि पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूपच उल्लेखनीय आहे. पुण्याहून कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात.
विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात भाविकांची संख्या नेहमीच वाढते. यंदाच्या दिवाळीमध्ये देखील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा 12 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यंदा 12 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी, दीपावली, लक्ष्मी कुबेर पूजन, 14 नोव्हेंबरला दीपावली पाडवा बलिप्रतिपदा आणि 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरा केला जाणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळात कोल्हापूरहून पुणे आणि पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे रेल्वेच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
ही गाडी पाच नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. म्हणजे दिवाळीच्या काळात या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
कसं असेल वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – कोल्हापूर ही गाडी पुण्यातून रात्री नऊ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे आणि कोल्हापूर येथे पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर कोल्हापूर येथून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पोहचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान सुरू करण्यात आलेली ही विशेष गाडी या कालावधीमध्ये या मार्गावरील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देणार आहे. या मार्गावरील सर्वच्या-सर्व म्हणजेच 20 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबेल अशी माहिती समोर आली आहे.