पुण्याच्या जोडप्याची कमाल, गुलाब शेती करून बदलले नशीब | Pune Farmer Success Story

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Farmer Success Story :- पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्‍यातील रावडी गावामधील वर्षा विश्‍वास जोशी आणि विश्‍वास हरी जोशी या उभयतांनी आपल्या मेहनत, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर ‘कोरोना संकटाकडे आपत्ती म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहिले. मागील पन्नास-पंचावन्न वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न साकारत घरगुती देशी गुलाबापासून जोशी फूडूस नावाने गुलकंदनिर्मिती उद्योग सुरू केला.

जोशी यांची आई गुलाबापासून भावंडांसाठी पाट्या-वरवंट्यावर वाटलेला गुलकंद बनवत असे. उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या त्रासापासून मुक्‍त होण्यासाठी आई दुधातून खायला गुलकंद देत असे. हा गुलकंद बनविण्याची कृती मनात घर करून बसली होती, ती पत्नीच्या साथीने कोरोना काळात उपयोगी पडून कुटीर उद्योगाचे उगमस्थान ठरले. पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेतही जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अखेरीस या छोट्या घरगुती उद्योगाचा प्रारंभ झाला.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्‍यातील रावडी गावामधील विश्‍वास हरी जोशी यांचे दहा गुंठे क्षेत्र जवळपास ४० वर्षे पडून होते. तेथे झाडा-झुडपांचे जंगल तयार झाले होते. ते जेसीबीच्या साहाय्याने समतल करून, जंगल साफ करून लागवडीसाठी योग्य बनविले. ट्रॅक्टरने नांगरट करून घेतली. नांगराने चार फुटांवर सरी करून घेतली आणि त्यात अतिघन तंत्रज्ञानाने आंबा लागवड करत असताना मधल्या सरीवर घराजवळ असलेली देशी गुलाबाची झुडपे छाटून साडेतीनशे गुलाबांचे छाट लावले.

बागेला पाणीपुरवठा विहिरीच्या साहाय्याने हिवाळ्यात दर आठ दिवसांनी व उन्हाळ्यात दर पाच-सहा दिवसांनी पाणी देणे आतापर्यंत कायम ठेवले आहे. वर्षातून दोन वेळा छाटणी केली जाते. सेंद्रिय व रासायनिक खते दिली जातात. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी तसेच चिकट पॅड लावल्याने किडे, पाखरे यांना आळा बसतो.

उन्हाळ्यात झाडांना अधिक फुटवा व अधिक फुले येऊ लागल्याने या फुलांचे करायचे काय, यातून गुलकंद बनविण्यास सुरुवात झाली. या पिकांबरोबरच कांद्याचे पीक घेतले. यात दीड टन कांद्याचे उत्पादन मिळाले. यातून फूलशेतीचा पायाभूत खर्च निघाला. गुलकंदाची विक्री ही नातेवाईक, ओळखी शोधून चार-पाचशे किलो गुलकंदाची विक्री केली. रोज सकाळी सर्व फुले तोडतो. फुले तोडताना गुलाबाचे काटे टोचून हाताला इजा होते.

मधमाश्या फुलातील पराग गोळा करत असतात. दोन-चार दिवसांनी एकदा तरी माशीचा डंख होतोच. चोवीस तास बोटे सुजतात. घरी फुले निवडायची, कचरा, देठे काढून निरोगी स्वच्छ पाकळ्या निवडायच्या. सायंकाळी मिक्सरवर पाकळ्या हाफ क्रश करून मागणीनुसार साखर, खडीसाखर, खांडसरी साखरेत मिसळून मुरायला झाकून दादरा बांधून उन्हात ठेवून गुलकंद तयार करून पॉलिथीनच्या पिशव्या भरून सीलिंग करून ठेवण्यास सुरुवात केली.

शासन नियमांनुसार फूड परवाने काढून फूड प्रॉडक्शन करून हा कुटीर व घरगुती उद्योग हळूहळू आकार घेत आहे. गुणवत्ता आणि आरोग्यपूर्ण निर्मिती याच्यावर दृढ विश्‍वास तसेच ग्राहकाचा आनंद हीच आमची विश्‍वासार्हता मानून वर्षाला मागणीनुसार साधी साखर, खडीसाखर, खांडसरी साखरेचा मिळून साधारणतः पाचशे किलो गुलकंद तयार करून विक्री केली जाते.

३०० ते ४०० रुपये प्रति किलो दर मिळतो. खेड्यात राहून उतारवयात स्वकष्टार्जित चार पैसे मिळतात. व्यायाम होतो, मन गुंतून राहते. मोकळा वेळ सत्कारणी लागतो. आनंदी जीवन जगता येते. गुलाबअर्क, खाद्यवस्तूंसाठी सुकी पाकळी आणि मिक्‍स ड्रायफ्रूट गुलकंद बनवण्याचा मानस आहे.

सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड, करंजी पेंड, कोंबडीखत, बकरी लेंढीखत याचा डोस वर्षातून दोन वेळा प्रति झाड २५० ग्रॅमप्रमाणे दिला जातो. तसेच सुफला, महाधन, मिश्रखत हे १०० ग्रॅम दर सहा महिन्यांनी दिले. आमच्या दोन्ही सुना फुले काढून साफ करून गुलकंद बनवणे आणि दोन्ही मुले पॅकिंग व खरेदी-विक्रीची कामे करतात.