Pune Farmer Success Story : सध्या बाजारात टोमॅटोला चांगला विक्रमी भाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. काही शेतकऱ्यांना तर टोमॅटोच्या पिकातून करोडो रुपयांची कमाई झाली आहे. खरंतर, दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला एवढा भाव नव्हता. मात्र आता अचानक टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून टोमॅटोचे बाजार भाव चांगलेच कडाडले आहेत.
याचा परिणाम म्हणून अनेकांना या लाल सोन्याने मालामाल करून सोडले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकरी दांपत्याला देखील टोमॅटो पिकातून लाखो रुपयांची कमाई झाली आहे. या शेतकरी दांपत्याला अवघ्या एक एकर जमिनीतून 15 लाख रुपये मिळाले आहेत. यामुळे या शेतकरी नवरा बायकोच्या जोडीच्या कष्टाला फळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील मांजरे वाडी येथील अरविंद मांजरे व त्यांच्या धर्मपत्नीने एक एकर जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड केली.एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागवड केली मात्र त्यावेळी उन्हाचा तडाका वाढत होता यामुळे टोमॅटो पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्च त्यांना करावा लागला. विशेष म्हणजे एप्रिलच्या सुमारास बाजारात टोमॅटोला फारसा भाव देखील मिळत नव्हता.
मात्र बाजारभावाचा विचार न करता आपण केवळ पीक उत्पादित करायचे पुढचं पुढे बघू या हेतूने त्यांनी टोमॅटो पिकासाठी खर्च करणे सुरू ठेवले. एक एकरात टोमॅटो पिकासाठी त्यांना दीड लाखाचा खर्च आला आहे. यातुन मात्र त्यांना 1,500 कॅरेटचे उत्पादन मिळाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांगला बाजार भाव मिळाला नाही मात्र नंतर चांगला दर मिळू लागला. सुरुवातीला 1500 ते 1700 रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळत होता. यानंतर मात्र भावात चांगली वृद्धी झाली.
यामुळे त्यांना टोमॅटोच्या पिकापासून आत्तापर्यंत पंधरा लाख रुपयांची कमाई झाली आहे. शिवाय अजूनही शेतात माल आहे. यामुळे कमाईचा हा आकडा वाढणारच आहे. शेतीमध्ये राबल्याचा फायदा होत असल्याचे अरविंद मांजरे यांनी सांगितले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव यावेळी पाहायला मिळालेत.