Pune Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक मोठमोठे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. रस्ते विकासाच्या या प्रचंड मोठ्या कामांमुळे वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत बळकट झाल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या एका दशकाच्या काळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण होणार आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असलेल्या पुणे रिंग रोडचे काम देखील येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे.
दुसरीकडे पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महापालिकेने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे हाती घेतलेले रुंदीकरणाचे काम आता जलद गतीने पूर्ण होणार असे चित्र तयार होत आहे.
खरे तर महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जलद गतीने प्रवास करता यावा त्यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान या महामार्गाची ज्या ठिकाणी रुंदी वाढवली जाणार आहे ती जागा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने भाडेतत्त्वावर दिली आहे. ही जागा 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. सध्या या जागेवर चित्रपटगृह अस्तित्वात आहे.
या जागेत एक हॉटेल देखील सुरू झालेले आहे. दरम्यान, ही जागा कॅन्टोन्मेंट बोर्डाने महापालिकेला देण्यास तयारी दाखवली. मात्र जागेचे मूल्यांकन करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे सूचित केले.
यानुसार महापालिकेने मूल्यांकन केले आणि संबंधितांना 43 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. मात्र महापालिकेने जाहीर केलेली नुकसान भरपाई अमान्य असल्याचे म्हणत हॉटेल चालकाकडून महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.
दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय रखडला होता. आता मात्र या प्रकरणावर माननीय न्यायालयाने सुनावणी घेतली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.
या सुनावणीत माननीय न्यायालयाने सदर जागेसाठी झालेले मूल्यांकन योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत या संबंधित व्यक्तींना दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हणजेच आता महापालिकेला ही सदर जागा ताब्यात घेता येणार आहे. यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय आता मार्गी लागणार आहे. या महामार्गाचे रुंदीकरण आता जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.