पुणे-अहमदनगर-संभाजीनगर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे प्रकल्प दिल्ली दरबारी अडकला, 268 किलोमीटरच्या 6 लेन मार्गाचे काम केव्हा सुरु होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Aurangabad Expressway : राज्यासह संपूर्ण देशभरात विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी मोठ-मोठी महामार्ग तयार केली जात आहेत. यामध्ये उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो.

समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटर लांबीचा असून यापैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर दरम्यानच्या पूर्ण झालेल्या मार्गावर वाहने देखील धावू लागली आहेत.

उर्वरित शंभर किलोमीटरचे काम नवीन वर्षात पूर्ण होईल आणि संपूर्ण महामार्ग नवीन वर्षात सुरू होणार असा अंदाज आहे. याशिवाय राज्यात इतरही अनेक महामार्गांचे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

प्रस्तावित महामार्गांमध्ये पुणे-अहमदनगर-संभाजीनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश होतो. हा महामार्ग गेल्यावर्षी प्रस्तावित करण्यात आला होता. या मार्गाची घोषणा दस्तूरखुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

या प्रस्तावित महामार्गाची एकूण लांबी 268 किलोमीटर एवढी आहे. हा सहा पदरी महामार्ग पुणे, अहमदनगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. या महामार्गात सर्वाधिक अंतर हे नगर जिल्ह्यात आहे.

हमदनगर जिल्ह्यात या महामार्गाची लांबी 126 किलोमीटर एवढी आहे. तसेच या महामार्गाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55 किलोमीटरचे अंतर आहे. बीड जिल्ह्यात सहा किलोमीटर एवढे अंतर आहे. तसेच पुणे जिल्ह्यात 80 किलोमीटर एवढे अंतर आहे.

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त अडीच तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. याशिवाय पुणे ते अहमदनगर हा प्रवास फक्त 75 मिनिटात पूर्ण होणार असे सांगितले जात आहे.

या महामार्गासाठी जवळपास 11000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी सर्वाधिक खर्च अहमदनगर जिल्ह्यातील मार्गासाठी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मार्गासाठी 5411 कोटी रुपयांचा खर्च होईल असा एक अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र हा बहुचर्चित आणि राज्यातील चार जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग आता बारगळण्याची शक्यता निर्माण होत आहे.कारण की, या महामार्गाचा प्रस्ताव गेल्या वर्षाभरापासून केंद्रीय भूसंपादन समितीकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

केंद्रीय समितीकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने महामार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हा अकरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प बारगळणार की काय अशी भीती आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा