सध्या टोमॅटो व मिरचीचे उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील जवळा, नान्नज परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो व मिरचीची लागवड पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र या लागवडीतील टोमॅटोला दर मिळणार की मातीमोल होणार?, अशी ही शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील जवळा, नान्नज, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद परिसरात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टोमॅटो, मिरचीचे पिकाची लागवड करण्यात आली आहे. ठिबक, मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे.
शेतकऱ्यांकडून मिरची व दोडका पिकाची लागवड करताना शेतीची मशागत करून ट्रॅक्टर चलित यंत्राद्वारे बेड तयार केला जातो. ठिबक टाकून त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले जाते. दोन बेडमध्ये चार ते पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून दोन रोपांमध्ये सव्वा ते दीड फुटाचे अंतर ठेवून रोप लागवड करण्यात आली आहे.
यात मिरची पीक आता चांगलेच वाढले असून, फुलोऱ्यात आले असून काही ठिकाणी कोवळी मिरची लागली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा लागून आहे. दरम्यान, सध्या मिरचीला ६० ते ८० रुपये प्रतिकिलो भाव असून मिरची कधी परिपक्व होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरवर्षी मिरची पिकाची लागवड करतो. यावर्षीही एक एकर क्षेत्रावर मिरची व तीस गुंठे क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत मिरची परिपक्व होणार असून, चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे..-ज्ञानदेव ढवळे, मिरची उत्पादक शेतकरी, हळगाव, ता. जामखेड