Potato Farming : भारतीय शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांमध्ये शेती व्यवसायात मोठे अमुलाग्र बदल केले आहेत. आता शेतकरी बांधव फक्त पारंपारिक पिकांची लागवड करतात असे नाही तर विविध फळ पिकाची, फळभाजी पिकांची आणि औषधी वनस्पतींची शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागवड केली जात आहे.
नगदी पिकांच्या शेतीला आता प्राधान्य दिले जात आहे. अलीकडे बटाटा या फळभाजी पिकाची देखील लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विशेष बाब म्हणजे बटाटा लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन आणि उत्पन्न मिळत आहे. हेच कारण आहे की, आपल्या राज्यातही बटाटा लागवड दिवसेंदिवस वाढत आहे.
पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन घेतले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात बटाट्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकते असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत आज आपण बटाट्याच्या काही सुधारित जातींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बटाट्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
कुफरी पुष्कराज : बटाट्याचा हा एक सुधारित वाण आहे. या जातीचे बटाटे आकाराने गोल, पिवळे आणि अंडाकृती असे असतात. या जातीच्या बटाट्याचा लगदा म्हणजेच आतील भाग हा हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. खरे तर या जातीचे पीक अवघ्या 75 दिवसात परिपक्व होत असते.
पण 75 दिवसानंतर या जातीच्या बटाट्याची हार्वेस्टिंग केली तर एकरी 90 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते तसेच 90 दिवसानंतर या जातीच्या पिकाची हार्वेस्टिंग केली तर एकरी 140 ते 160 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच उच्च उत्पादनासाठी ओळखली जाणारी बटाट्याची ही सुधारित जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कुफरी अशोका : बटाट्याची ही देखील एक सुधारित जात आहे. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे पीक सरासरी 75 ते 80 दिवसात परिपक्व होते आणि हेक्टरी 250 ते 300 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
कुफरी लालिमा : हा देखील बटाट्याचा एक सुधारित वाण आहे. शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष लोकप्रिय ठरला आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. बटाट्याचा हा वाण 90 ते 100 दिवसात परिपक्व होत असतो. या जातीपासून हेक्टरी 250 ते 300 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
कुफरी सदाहरित : बटाट्याचा हा वाण उच्च उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. शेतकऱ्यांमध्ये या जातीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या जातीचे पीक 80 ते 90 दिवसात परिपक्व होते आणि जवळपास हेक्टरी तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते.
कुफरी अलंकार : बटाट्याचा हा आणखी एक सुधारित वाण आहे. या जातीची देशातील विविध बटाटा उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याचे पाहायला मिळते. हा वाण उच्च उत्पादनासाठी ओळखला जात असून या जातीचे बटाटे बाजारात कायमच मागणीमध्ये राहतात. ही एक अल्पकालावधीत उच्च उत्पादन देणारी जात आहे. या जातीचे पीक मात्र 70 दिवसात परिपक्व होते. विशेष बाब म्हणजे कमी दिवसात काढणीसाठी तयार होत असली तरी देखील या जातीपासून 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टर एवढे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
2 महिन्यात 8 लाखांचा नफा कसा मिळणार
जर बटाट्याच्या पिकातून एव्हरेज हेक्टरी 300 क्विंटल चे उत्पादन मिळाले आणि बटाट्याला वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो भाव मिळाला तर शेतकऱ्यांना या पिकातून चांगली कमाई होऊ शकते. एखाद्या शेतकऱ्याने 5 हेक्टर मध्ये लागवड केली आणि वीस रुपये प्रति किलो एवढा भाव जर बटाट्याला मिळाला तर शेतकऱ्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपयांचा नफा या ठिकाणी मिळू शकणार आहे.