Pomegranate Market Price :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (२४ जुलै) ११ हजार ८३२ क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो १११ ते १६० रुपये भाव मिळाला.
तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो ७६ ते ११० रुपये भाव मिळाला. कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्वंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र ७६ हजार १७२ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक ३७ हजार ६७७ हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात.
राहाता बाजार समितीत रविवारी शेतकऱ्यांनी ११ हजार ८३२ क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक १११ ते १६० रुपये भाव मिळाला.
दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो ७६ ते ११० रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो ३६ ते ७५ रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबांना १० ते ३५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या भावात किलोमागे १०० रुपयांची घट झाली असून आवकही कमी झाली आहे.
कांद्याला मिळाला १६०० रुपयांपर्यंत भाव
राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याचे लिलावही झाले. यावेळी १० हजार ८५९ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला.
दोन नंबर कांद्याला ८५० ते ११५० रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये, तर जोडकांद्याला १०० ते ३०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.