Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली. खरंतर 22 जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन झालेले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली.
या योजनेची घोषणा मात्र त्यांनी दिल्लीमधून केली होती. त्यावेळी त्यांनी देशभरातील एक कोटी कुटुंबांना या योजनेअंतर्गत महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची मोफत वीज मिळणार असा दावा केला होता. यानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी या योजनेची केंद्रीय अर्थसंकल्पात माहिती दिली.
नंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली. या योजनेचे अधिकृत पोर्टलही सुरू झाले. मात्र या योजनेचे नाव आता चेंज करण्यात आले आहे. पीएम सूर्योदय योजने ऐवजी आता या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल, यासाठी अर्ज कुठे करावा लागणार, तसेच अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अनुदान किती मिळणार बरं
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये तीस हजार रुपयांपासून ते 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. एक किलो वॅट क्षमतेपासून ते दहा किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी हे अनुदान दिले जाणार आहे.
यात एक किलो वॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी 30 हजार रुपये, दोन किलो वॅट क्षमता असलेल्या सोनर पॅनल साठी 60 हजार रुपये, तीन किलो वॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपये, तसेच 3 किलोवॅट पेक्षा अधिक आणि 10 किलो वॅट पर्यंतची क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी देखील 78 हजार रुपये एवढेच अनुदान या ठिकाणी सरकारकडून दिले जाणार आहे.
योजनेच्या पात्रता
याचा लाभ कोणत्याही भारतीय नागरिकाला मिळू शकणार आहे.
याचा लाभ हा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळणार नाही.
स्वतःचे घर असलेले नागरिकच या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र राहतील.
ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे.
सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र राहतील.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार ?
वर नमूद केलेल्या पात्रता धारक अर्जदाराला अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, वीज बील, रहिवाशी दाखला, बँक खात्याचा तपशील (पासबुक), मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकारचे फोटो असे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत.
अर्ज कुठे करणार ?
केंद्र शासनाने अलीकडेच सुरू केलेली ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
https://pmsuryaghar.gov.in/ या शासनाने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सुरू केलेल्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज करण्यास सक्षम बनणार आहात.