Pm Kisan Yojana News : गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळेच उधाण आले होते. खरे तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे वाढवले जाणार अशी घोषणा केली होती.
त्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा 6000 रुपयांचा निधी भविष्यात 9 हजार रुपये करू असे आश्वासन दिले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा निधी लवकरच वाढवला जाणारा अशा चर्चा सुरू झाल्यात.
साहजिकच या संदर्भात विरोधकांकडूनही सरकारला प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान याच संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने संसदेत मोठी माहिती दिली.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी वाढवण्याबाबत सरकार दरबारी प्रस्ताव विचाराधीन आहे की नाही याबाबत सभागृहाला अवगत केले.
मंत्री ठाकूर यांनी सांगितले की, पीएम किसानमधून मिळाऱ्या निधीत वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. तसेच आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना १८ हप्त्यांच्या माध्यमातून ३ लाख ४६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, असेही मंत्री ठाकूर यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.
तसेच सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कांद्याच्या हमीभावाबाबत प्रश्न विचारला होता. खासदार वाजे यांनी लोकसभेत सरकार कांद्याला हमीभाव देण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न विचारला होता.
या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री ठाकूर यांनी सरकार सध्या २२ पिकांचे हमीभाव केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार करते. कोणत्याही पिकाला हमीभाव जाहीर करण्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो.
त्यात त्या पिकाची टिकवण क्षमता, पिकाची व्याप्ती, पिकाचा व्यापक वापर, अन्न सुरक्षेसाठी अत्यावश्यक आणि इतर गोष्टींचा विचार करूनच त्या पिकाला हमीभाव द्यायचा की नाही हे ठरवले जाते असं म्हणतं ठाकूर यांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबतचा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे मात्र शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवली जाणार असे वाटत होते.
विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच असे संकेत दिले होते. मात्र आता सरकारने पी एम किसान ची रक्कम वाढणार नाही हे स्पष्ट केले आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत आहे.