Plastic Mulching Paper : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेतीत मोठा बदल पहायला मिळाला आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती कसली जात असत आता मात्र शेती करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता शेतकरी बांधव आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत.
याचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचन प्रणाली, मल्चिंग पेपर, ड्रोन फवारणी, नॅनो युरिया, नॅनो डीएपी इत्यादी आधुनिक पद्धतींचा, उपकरणांचा आणि खतांचा वापर वाढू लागला आहे. यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मल्चिंग पेपरवर फळपिके, भाजीपाला पिके आणि कांद्यासारखी नगदी पिकांची लागवड होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आज आपण मल्चिंग पेपरचे प्रकार आणि त्यांच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचे प्रकार आणि त्यांच्या विशेषता
पारदर्शक प्लॅस्टिक मल्चिंग आच्छादन : पारदर्शक प्लॅस्टिक मल्चिंग पेपर हा मल्चिंग पेपरचा एक प्रकार आहे. या मल्चिंग पेपरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. याचे आच्छादन केल्यास सूर्याची किरणे थेट जमिनीवर आदळू शकतात. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते.
काळे प्लॅस्टिक मल्चिंग पेपर : हा आणखी एक मल्चिंग पेपरचा प्रकार आहे. या प्रकारचे मल्चिंग केल्यास या सूर्याची किरणे थेट जमिनीवर आदळली जात नाहीत. परिणामी जमिनीचे तापमान वाढत नाही.
सूर्यकिरणे परावर्तित करणारे मल्चिंग पेपर : शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपरचा हा प्रकार फायदेशीर ठरू शकतो. या प्रकारचे मल्चिंग केल्यास पिकावर मावा आणि तुडतुडे कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. हे पांढरे किंवा चंदेरी रंगाचे मल्चिंग पेपर असते. त्यातून सूर्याची किरणे परावर्तित होतात आणि पिकाला चहू बाजूने सूर्यप्रकाश मिळतो.
इन्फ्रारेड प्रकाशाला पारदर्शक मल्चिंग पेपर : मल्चिंग पेपरचा हा देखील एक महत्त्वाचा प्रकार आहे. या मल्चिंग पेपर मधून सूर्यप्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीवर पोचू शकतात. मात्र तणवाढीसाठी उपयुक्त किरणे जमिनीत पोहोचत नाहीत. यामुळे अशा प्रकारचे मल्चिंग केल्यास तण वाढत नाही.
रंगीत मल्चिंग पेपर : विविध पिकांसाठी वेगवेगळे मल्चिंग पेपर वापरले जातात. वेगवेगळे रंगाचे मल्चिंग पेपर वापरले जातात. वेगवेगळ्या रंगाचे मल्चिंग चे वेगवेगळे फायदे देखील आहेत.
विणलेले सछिद्र मल्चिंग पेपर : हा मल्चिंग पेपर गादीवाफ्यावर वापरला जाऊ शकतो. स्ट्रॉबेरी सारख्या पिकासाठी याचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. अधिक काळ टिकणाऱ्या छोट्या फळझाडासाठी हे मल्चिंग पेपर फायदेशीर ठरते.