Pik Vima Yojana 2023 : आज गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारस. आजपासून दिवाळीचा सण सुरू होतो. 12 तारखेला दीपावली पाडवा अर्थातच दिवाळी सण साजरा होणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वसंध्येवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर यावर्षी खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मोठा मारक ठरला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात यावर्षी महाराष्ट्रात 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांना दुष्काळाची झळ बसली आहे. या 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात दुष्काळाची झळ अधिक पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजा अक्षरशा भरडला गेला आहे. सोयाबीन, कापूस, मका, कांदा यांसारख्या सर्वच पिकांच्या उत्पादनात विक्रमी घट आली आहे.
यामुळे आता शेतीसाठी आलेला खर्च भरून कसा काढायचा आणि संसाराचा गाडा कसा हाकायचा हा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी बांधव कर्जबाजारी होतील असे चित्र तयार झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने भरीव मदत दिली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी देखील मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती.
अशातच आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा योजनेत संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे. मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. काल अर्थातच 8 नोव्हेंबर 2023 पासून पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
कृषी मंत्री महोदय यांनी सांगितले की राज्यातील विविध जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त क्षेत्राचं केलेल्या सर्वेक्षणाचे अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील जवळपास ३५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम दिली जाणार आहे. याचा श्री गणेशा देखील आता झाला आहे. कालपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे दिवाळीच्यापूर्वीच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची 25% अग्रीम रक्कम जमा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. राज्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १ हजार ७४३ कोटी रुपये एवढी पीक विम्याची अग्रीम रक्कम वितरीत करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे.
निश्चितच दिवाळीच्या तोंडावर पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याने यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे बोलले जात आहे. तथापि आता ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्यापूर्वीच मिळते का हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.