Papaya Farming : राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात चांगली प्रगती साधत आहेत. विशेषता पश्चिम महाराष्ट्रमधील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यात तसेच देशात आपली ख्याती वाढवली आहे.
कोल्हापूर सांगली सातारा पुणे नासिक यांसारख्या जिल्ह्यात प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने आणि आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आता मिळत आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पपई पिकाच्या शेतीतून मात्र सव्वा एकरात 23 लाखांची कमाई केली आहे.
यामुळे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील मौजे कुंडल येथील प्रतीक पुजारी या प्रयोगशील शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला असून आपल्या सव्वा एकरात त्यांनी पपईची लागवड केली आहे. प्रतीक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या सव्वा एकर शेतजमिनीत 1100 पपईच्या रोपांची लागवड केली. कोणत्याही पिकाच्या शेतीतून चांगली कमाई करण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित वाणाची शेती होणे अत्यावश्यक असते.
यामुळे प्रतीक यांनी पपईच्या जातीची निवड करताना काळजी घेतली आणि पपईच्या सुधारित वाणाची निवड केली. त्यांनी पपईच्या 15 नंबर जातीची लागवड केली. या अकराशे पपईच्या रोपातून त्यांना तब्बल दोनशे टन इतकं विक्रमी उत्पादन मिळालं. बाजारात दरही चांगला मिळाला असल्याने त्यांना तब्बल 23 लाखांची कमाई झाली. प्रतीक यांच्या मते त्यांनी पपई पिकाच्या चांगल्या वाढीसाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित प्रमाणात वापर केला. त्यामुळे पिकाचे चांगले उत्पादन त्यांना मिळवता आले.
शिवाय पपईचा दर्जा देखील राखता आला. हेच कारण आहे की बाजारात त्यांनी उत्पादित केलेल्या पपईला चांगली मागणी राहिली आणि अपेक्षित असा दरही मिळाला. निश्चितच मात्र सव्वा एकरात 23 लाखांची कमाई करत पुजारी यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं असून यामुळे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वेगळेपण सिद्ध झाल आहे.