Panjabrao Monsoon 2024 : मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून 2024 बाबतचा आपला नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाबरावांनी सध्या सुरू असलेल्या वादळी पावसाचे थैमान आणखी किती दिवस सुरू राहणार, कोणत्या भागात मान्सूनपूर्व पाऊस होणार आणि मान्सून 2024 चे महाराष्ट्रात कधी आगमन होणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. दरम्यान, आता आपण पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात नेमके काय म्हटले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाबराव म्हणतात…
डख यांनी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वर दिलेल्या माहितीनुसार, आज अक्षय तृतीया अर्थातच 10 मे पासून ते 15 मे पर्यंत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तथा विदर्भ आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता आहे. खरे तर आधी पंजाबरावांनी 11 मे पर्यंत पावसाचा अंदाज दिला होता. 7 में पासून पावसाला सुरुवात होईल आणि 11 मे पर्यंत पाऊस सुरू राहणार असे पंजाब रावांनी म्हटले होते. दरम्यान पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अशातच आता पंजाब रावांनी नवीन अंदाज दिला असून पूर्व मौसमी पावसाचा मुक्काम लांबला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आता 15 मे पर्यंत कायम राहणार असा नवीन अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
या कालावधीत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, मराठवाड्यातील लातूर, बीड, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात देखील पावसाचा अंदाज आहे. त्यांनी आज 10 मे पासून सगळीकडे पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे. तसेच हा पाऊस पुढील पाच ते सहा दिवस अर्थातच 15 ते 16 मे पर्यंत कायम राहणार असा अंदाज आहे.
मान्सूनबाबत पंजाबरावांनी काय अपडेट दिली
पंजाबरावांनी यंदा 22 मे ला अंदमानात मान्सूनचे आगमन होणार आणि त्या पुढील 20 दिवसात अर्थातच 9 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असे म्हटले आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या जून अखेरपर्यंतच होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच यावर्षी जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस पडणार आणि ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस होणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच यंदा 5 नोव्हेंबर 2024 ला मान्सून माघारी फिरणार असे त्यांनी आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे.