Panjabrao Dakh Latest News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसांमध्ये रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. सोयाबीन, कापूस, मका यांची हार्वेस्टिंग सुरू आहे तर काही ठिकाणी नवीन हंगामातील शेतमाल देखील बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागला आहे.
याचाच अर्थ येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. रब्बी हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे सध्या सर्वत्र जोर धरू लागली आहेत.
अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी हरभरा आणि गहू पेरणी केव्हा केली पाहिजे तसेच हरभरा लागवडी दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. आज आपण पंजाबरावांनी दिलेली हीच माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, गहू आणि हरभरा पेरणी केव्हा करायची हे जाणून घेण्यासाठी एका स्टीलच्या भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि जर खोबरेल तेल घट्ट झाले तर अशावेळी गहू आणि हरभरा पेरणी करण्यास काही हरकत नाही.
म्हणजेच ज्यावेळी थंडीची तीव्रता वाढेल त्यावेळी हरभरा आणि गव्हाची पेरणी करण्याचा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे. तसेच पेरणी करण्यासाठी सर्वप्रथम रोटावेटर मारून घ्या आणि यानंतर हरभऱ्याच्या सुधारित जाती निवडून 18 इंचावर किंवा 24 इंचावर पेरणी करा असा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे.
तसेच पेरणीपूर्वी एक बॅग खताची आणि 10 किलो गंधक लावण्याचा सल्ला दिला आहे. परंतु हरभरा बियाण्याची पेरणी खोल करावी आणि एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले आहे. पंजाबराव सांगतात की, जेवढा हरभरा दाट पेराल तेवढा त्यापासून चांगला उतारा मिळेल.
यासोबतच, त्यांनी हरभरा पेरणी केली आणि त्याच दिवशी जर समजा जमिनीत ओलावा नसेल आणि पाणी द्यायचे असेल तर पहिल्या दिवशी स्प्रिंकलरने दोन तास पाणी दिले पाहिजे, पेरणीनंतर 20 दिवसांनी दुसरे पाणी दिले पाहिजे आणि दुसरे पाणी जवळपास पाच तास दिले पाहिजे.
तसेच तिसरे पाणी पेरणीनंतर 40 दिवसांनी सात तास देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यासोबतच फुलोराअवस्थेत पाण्याचा ताण द्यावा असं देखील त्यांनी सांगितले आहे.