Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी पावसाने विश्रांती घेतली आहे. वादळी पाऊस थांबला असून आता तीव्र उष्णता जाणवत आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे.
वाढत्या उकाड्यामुळे मात्र नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे, वादळी पाऊस थांबला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
मे महिन्यात देखील वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी जारी केला आहे.
दरम्यान आता आपण पंजाब रावांनी केव्हापासून वादळी पावसाला सुरुवात होणार आणि किती दिवस वादळी पाऊस बरसणार या संदर्भात काय माहिती दिली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विदर्भ : विदर्भ विभागातील पश्चिम भागात आणि पूर्व भागात सात मे ते 11 मे दरम्यानच्या पाच दिवसांच्या कालावधीत जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा : मराठवाडा विभागात देखील जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 मे पासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्र देखील 7 मे ते अकरा मे दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस बरसणार असून याचा कांदा पिकाला फटका बसू शकतो. मात्र ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
कोकण : मुंबई सह संपूर्ण कोकण विभागात 7 मे ते 11 मे दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या भागात देखील मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र : नाशिकसहित उत्तर महाराष्ट्र विभागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता असून तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.