Panjabrao Dakh Havaman Andaj : कालपासून राज्यातील हवामानात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे तयार झालेले ढगाळ हवामान आता पूर्णपणे निवळले आहे. यामुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे.
राज्यासह देशातील विविध भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून याचा परिणाम म्हणून गारठ्यात वाढ झाली आहे. आता थंडीचा जोर वाढत असल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
दरम्यान, थंडीमध्ये वाढ झाली असल्याने याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा मिळेल अशी आशा आहे. खरंतर गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.
अशा परिस्थितीत सध्या पडत असलेला हा गारठा पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार असे मत व्यक्त होत आहे. असे असतानाच मात्र राज्यातील हवामानाने कलाटणी घेतली आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा वातावरण खराब होईल आणि अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी आज 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आजपासून पुढील तीन-चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार तर काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
तीन ते चार दिवस या जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील तर यापैकी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडेल सर्व दूर पाऊस पडणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
याशिवाय इतरही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र 20 डिसेंबर पासून पुन्हा एकदा राज्यातील हवामान कोरडे होईल आणि थंडीचा जोर वाढणार आहे.