Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्य आग ओकत आहे. तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा साऱ्याच विभागांमध्ये तापमानाने विक्रम मोडले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला असून यामुळे महाराष्ट्रातील उकाडा काही अंशी कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
परंतु या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा नुकसान होऊ शकते अशी भीती आहे. हवामान खात्याने 9 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून पावसाला सुरुवात होईल आणि 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रात वादळी स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार आहे. सात एप्रिल पासून पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. पश्चिम विदर्भात मात्र आठ एप्रिल पासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट सुद्धा होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. याशिवाय राज्यातील मराठवाडा विभागात 9 ते 12 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात देखील नऊ ते बारा या कालावधीत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या कालावधीत अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे पंजाबराव यांनी यावेळी म्हटले आहे.
जर पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात कांदा काढणी प्रगतीपथावर आहे.
दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात रब्बी पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. हळद काढणी सुरू आहे. अशातच IMD ने आणि पंजाबरावांनी अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.