Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाजात त्यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामानाबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
आगामी काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार, कुठे पाऊस पडणार, कुठे ढगाळ हवामान राहू शकते याविषयी डिटेल माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. खरंतर, यापूर्वीच्या हवामान अंदाजात त्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात यावर्षी पाऊस पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
पण नुकत्याच जारी केलेल्या सुधारित अंदाजात त्यांनी नवरात्र उत्सव 2023 मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, उद्या अर्थातच 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.
उद्या घटस्थापनेच्या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल आणि विजयादशमीच्या दिवशी अर्थातच 24 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, या 9 दिवसांपैकी 3 दिवसाच्या काळात राज्यातील काही भागात पंजाबराव डख यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
केव्हा बरसणार पाऊस ?
डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता राहणार आहे. या कालावधीत राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड आणि कोकणात पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीमध्ये गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोव्यातील पणजी मध्ये 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. परंतु या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्यात पडणारा पाऊस हा खूपच हलक्या स्वरूपाचा राहणार आहे. म्हणजेच यावेळी खूप मोठा पाऊस पडणार नाही. काही भागात तर फक्त ढगाळ हवामान राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील आणि गोव्यातील हे काही जिल्हे वगळता उर्वरित राज्यात 25 ऑक्टोबर पर्यंत प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मात्र 28 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल होण्याचा अंदाज असून नोव्हेंबरमध्ये यंदा चांगला पाऊस पडेल असे मत पंजाबरावांनी वर्तवले आहे. यावर्षी दिवाळीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. यामुळे आता पंजाबराव डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.