Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यात वादळी पावसामुळे आणि गारपीटी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता मात्र वादळी पाऊस थांबला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तथापि वादळी पावसाचे संकट येत्या काही दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घोंगावणार असा अंदाज समोर येत आहे.
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि गारपीट पाहायला मिळू शकते. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता तयार होत असल्याचा अंदाज नुकताच जारी केला आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आता मान्सून आगमनास अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. पुढल्या महिन्यात मान्सून आगमन होणार आहे.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात यावर्षी चांगला पाऊसमान पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केव्हा सुरु होणार मुसळधारा ?
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सात मे पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 मे ते 11 मे या पाच दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कालावधीत खूपच मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे.
शेतशिवारात पाणी साचेल असा पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांनी आपल्या अंदाजात म्हटले आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सहा मे पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
यामुळे या कालावधीत शेतकरी बांधवांनी कांदा, हळद यांसारख्या पिकांची काढणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्या भागात पडणार पाऊस
7 मे पासून मात्र राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस मात्र ऊस पिकासाठी मोठा फायदेशीर ठरणार असा दावा केला जात आहे. एकंदरीत नुकतेच राज्यातील वादळी पावसाचे सत्र थांबले होते.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर मान्सून पूर्व पावसाचे ढग तयार होत आहेत. निश्चितच जर पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती नाकारून चालणार नाही.